अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सातही तालुक्यांत निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाºयांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि त्यांतर्गत सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. त्यामध्ये सात उपविभागीय अधिकाºयांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि संबंधित सातही तहसीलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांची जिल्हाधिकाºयांनी बैठक घेतली असून, आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरण्याच्या प्रक्रियेसंदर्भात तालुका स्तरावर प्रशिक्षण घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांच्यासह सातही तालुक्यांतील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.तालुकानिहाय असे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी!जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सात निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (महसूल) गजानन सुरंजे, बार्शीटाकळी तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तेल्हारा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अकोला तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, अकोट तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी, बाळापूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी रमेश पवार व मूर्तिजापूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.