अकोला: महिला व मुलींच्या छेडखानीला पायबंद घालणे आणि प्रत्येक महिलेला भयमुक्त वातावरणात वावरता यावे, म्हणून पोलिस दलाने स्वतंत्र दामिनी पथक गठित केले आहे. या पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली आहे.
काही वर्षापूर्वी चिडीमार विरोधी पथक प्रमुख म्हणून नयना पोहेकर यांनी अंत्यत प्रभावीपणे काम केले होते. त्यानंतर या पथकाचे नामांतर दामिनी पथक झाले आणि डॅशिंग महिला अधिकारीच या पथकाला न लाभल्याने केवळ कागदावर हे पथक राहिले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी प्रभार घेतल्यानंतर महिलांच्या सुरक्षेला त्यांचे प्राधान्यक्रम असल्याची त्यांची हातोटी आहे. महिलांची छेडखानी होवू नये, छेडखानी करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त व्हावा, म्हणून पथक नव्याने गठीत केले आहे. या पथकाची जबाबदारी पोलिस अधिकारी स्वाती इथापे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्वाती इथापे या ११४ च्या बॅचच्या पोलिस उपनिरीक्षक असून, यापूर्वी त्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखा, रामदासपेठ पोलिस ठाणे, जुने शहर पोलिस ठाण्यात काम केले आहे. सध्या दोन वर्षापासून इथापे या मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. शहरातील छेडखानीच्या घटना रोखणे, महिला व मुलींची सुरक्षा तसेच कोचिंग क्लास परिसरातील विद्यार्थीनींना भयमुक्त वातारवण निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.