अकोला : कमी आर्थिक उत्पन्न असणे ही मूळ समस्या नसून उपलब्ध पैशाचे गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन नसणे हे आर्थिक समस्येचे कारण असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. पंकज वाकोडे यांनी प्रतिपादन केले. भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाद्वारे प्रभात किड्स स्कूल येथे घेण्यात आलेल्या वित्तीय शिक्षण कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात किड्स संचालक डॉ गजानन नारे होते. आर्थिक साक्षरतेबद्दल जागरुकता सत्रात त्यांनी विविध वित्तीय योजनाबाबत मार्गदर्शन केले. बहुतेक वेळा बचत आणि गुंतवणुकीतील फरकच स्पष्ट नसतो. बचत ही अल्पकालीन असते आणि त्यातून मिळणारा परतावा देखील अत्यल्प असतो. तर गुंतवणूक ही दीर्घकालीन असते व त्यातून मिळणारा परतावा अधिक असतो, मात्र गुंतवणुकीसाठी आर्थिक नियोजन व शिस्त याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या योजनेत गुंतवणूक केली जात आहे, त्या योजनेबाबत पूर्ण खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. सुरक्षितता, परतावा आणि लिक्विडीटी असलेल्या योजनांमध्ये तसेच योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध वित्तीय सुविधांवर व तसेच विविध बँका, विमा कंपनी, निवृत्तीवेतन योजना तसेच शेअर मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. आरबीआय, सेबी, आयआरडीए सारख्या नियंत्रक संस्थांमुळे आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आली असल्याचे ते म्हणाले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मल्टी सेक्टर फंडाची निवड करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच विविध वित्तीय सेवांचा लाभ घेताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी डॉ.गजानन नारे यांनी प्रा. पंकज वाकोडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रभात किड्स स्कूलचे व्यवस्थापक अभिजित जोशी यांनी केले. प्रभातच्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाNयांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
गुंतवणुकीसाठी योग्य नियोजन महत्वाचे: ‘प्रभात’मध्ये वित्तीय साक्षरतेवर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:21 PM
अकोला : कमी आर्थिक उत्पन्न असणे ही मूळ समस्या नसून उपलब्ध पैशाचे गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन नसणे हे आर्थिक समस्येचे कारण असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. पंकज वाकोडे यांनी प्रतिपादन केले.
ठळक मुद्देभारत सरकारच्या उपक्रमांतर्गत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाद्वारे प्रभात किड्स स्कूल येथे कार्यशाळा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात किड्स संचालक डॉ गजानन नारे होते. विविध बँका, विमा कंपनी, निवृत्तीवेतन योजना तसेच शेअर मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला.