अकोला: जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात सायकल, शिलाई मशीन वाटपासह विविध साहित्याचे वाटप आणि प्रशिक्षणाच्या २ कोटी १० लाख रुपयांच्या योजना राबविण्यास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद दहा टक्के सेस फंडातून २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत २ कोटी १० लाख रुपयांच्या निधीतून विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप, महिलांसाठी शिलाई मशीन, पिको फाॅल मशीन, कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार पुरवठा तसेच विविध प्रशिक्षणाच्या योजना राबविण्याचे या सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.