अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आणखी ६६ गावांच्या प्रकल्प आराखड्यास जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ४ जून रोजी मंजुरी देण्यात आली असून, मंजूर आराखड्यानुसार मृद व जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्राम कृषी संजीवनी समिती आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण ४९८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १०५ गावांपैकी ४२ गावांच्या प्रकल्प आराखड्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरित ६३ गावांच्या प्रकल्प आराखड्यास ४ जून रोजी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार संबंधित गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. प्रकल्पांतर्गत संबंधित गावांतील भूमिहीन, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रकल्पांतर्गत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी या बैठकीत केले.प्रकल्पांतर्गत शेतकºयांसाठी अशा आहेत योजना!कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांतील लाभार्थी घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये भूमिहीन तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला लाभार्थींसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन योजना, अल्प व अत्यल्पभूधारक लाभार्थी शेतकºयांसाठी फळबाग, शेडनेट, हरितगृह, प्लास्टिक टनेल, मधुमक्षिकापालन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मृदसंधारण, शेततळे, सामूहिक शेततळे व इतर कृषी आधारित व्यवसाय, तसेच शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कृषी उत्पादनाचे संकलन केंद्र, कृषी उत्पादनाचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, गोदाम व लहान वेअर हाउस, फळ पिकवणी केंद्र, फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी शीतवाहन, कृषी मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, वातानुकूलित कृषी माल विक्री केंद्र, कृषी माल प्रक्रिया केंद्र व इतर कृषी आधारित व्यवसाय इत्यादी योजनांचा समावेश आहे.