अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्तीसह विविध २१३ कामांच्या यादीला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित २१३ कामांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या गत २८ फेबु्रवारी रोजी झालेल्या सभेत ६ कोटी ५० रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण व इतर २१३ कामांच्या यादीला मंजुरी देण्यात आली होती; परंतु या कामांच्या यादीसंदर्भात आक्षेप घेत जिल्हा परिषदेतील विरोधी गटाच्या सदस्यांनी ५ मार्च रोजी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करून आव्हान दिले होते. विरोधकांची ही याचिका गत आठवड्यात विभागीय आयुक्तांनी फेटाळली. त्यानंतर १२ जुलै रोजी झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत ६ कोटी ५० लाख रुपयांच्या २१३ कामांच्या यादीला मंजुरी देण्यात आली असून, संबंधित कामांचा कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) देण्याचे सभेत ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसह विविध २१३ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती जमीरउल्लाखा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला समितीचे सदस्य प्रतिभा अवचार, संतोष वाकोडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.इमारतींच्या दुरुस्तीसाठी १.७५ कोटींचा निधी मंजूर!जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध विभागांच्या कार्यालय इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीच्या कामांसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचा ठराव या सभेत घेण्यात आला.