वाडेगाव येथून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. बाळापूर-पातूर मार्गावरील एका हॉटेलजवळ गावात येणारी पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. यामुळे वाडेगावमधील ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आधीच नागरिकांना बारमाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची वाडेगाव येथील वास्तविकता आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या पाणीटंचाईमध्ये भर पडली आहे. ही फुटलेली जलवाहिनी तत्काळ दुरुस्त करण्याची स्थानिक व व्यावसायिक ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
........................
वाडेगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी बारमाही भटकंती करावी लागत आहे. जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तत्काळ फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी.
सचिन धनोकार, वाडेगाव
........................
रस्त्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले, तरी याबाबत लक्ष देऊन दुरुस्ती करावी. जणेकरून ग्रामस्थांना त्रास होणार नाही.
श्रीकृष्ण टाकळकर, ग्रामरोजगार सेवक, वाडेगाव
-------------