आशिष गावंडे/अकोला
अकोला: जुने शहरातील हरिहर पेठ भागात ऑटोचा एका दुचाकीस्वाराला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन समुदायात दगडफेकीची घटना सोमवारी सायंकाळी ४.४७ वाजताच्या सुमारास गाडगेबाबा चौकात घडली. यावेळी काही समाजकंटकांनी ऑटोसह दोन दुचाकी वाहनांची जाळपोळ केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हरिहर पेठ भागातील संत गाडगेबाबा चौकात एका दुचाकीस्वाराला ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद आपसात मिटविण्यात आल्यानंतर लगेच एका समुदायाने काही क्षणाच्या आत दुसऱ्या समुदायातील मुले व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किराणा दुकानात आलेल्या महिलांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात महिलांची धावपळ सुरू झाली. दगडफेक होत असल्याचे पाहून संरक्षणासाठी दुसऱ्या समुदायातील मुले रस्त्यावर उतरली व त्यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर दगडफेक सुरू केली. यादरम्यान, अज्ञात इसमाने घटनास्थळावरील ऑटो व काही दुचाकींना आग लावल्याने ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली. दगडफेकीची घटना हरिहर पेठ भागात वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही समुदायातील तरुण एकमेकांसमोर उभे ठाकले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...................रस्त्यावर दगडांचा खचहरिहर पेठ मधील संत गाडगेबाबा चौक व त्यालगतचा परिसर अतिशय संवेदनशील समजला जातो. नेमका याच ठिकाणी हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दगड विटांचा अक्षरशः खच साचून असल्याचे दिसून आले. ..................समाजकंटकांचा शोध सुरूदगडफेक करणाऱ्या व वाहनांची जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांचा पोलीस यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे...........................हरिहर पेठ, शिवसेना वसाहतमध्ये कडेकोट बंदोबस्तजिल्हा पोलीस अधीक्षक सिंह यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा हरिहर पेठ तसेच शिवसेना वसाहतमधील दुर्गा चौक अंबिकानगर आदी परिसरात तैनात केली आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, जुने शहरचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर,डाबकी रोडचे पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने, शहर वाहतूक शाखा प्रमुख सुनील किनगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून होते. ............भाजपचे माजी नगरसेवक जखमीहरिहर पेठ मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना वसाहतमधील दुर्गा चौक व अंबिका नगर परिसरात दोन समुदायात दगडफेक सुरू झाली. हा प्रकार थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेले भाजपाचे माजी नगरसेवक अमोल गोगे जखमी झाले. त्यांच्या डोक्यावर दगड लागल्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. ......................भाजप लोकप्रतिनिधींची हरिहर पेठमध्ये धावघटनेची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी हरिहर पेठ भागात धाव घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासोबत चर्चा केली तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.