शेगाव (बुलडाणा): शहरातील वारकरीनगर या भरगच्च वस्ती असलेल्या भागात बुधवारी पहाटे ३.३0 च्या सुमारास दरवाजा तोडून अनोळखी तीन इसमांनी घरात घुसून व घरमालकास चाकू लावून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख, असा सुमारे ३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. उल्लेखनीय म्हणजे सेवानवृत्त शिक्षकास चोरट्यांनी पाणीही आणून पाजले. शेगाव येथील वारकरीनगरात राहणारे सेवानवृत्त शिक्षक दिगांबर रामचंद्र वाघमारे यांच्या घरात बुधवारी रात्री तीनच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी मागील दरवाजा टॉमीने तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख १८ हजार रुपये, चांदीचे शिक्के ८ नग, पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून लुटून नेले. यात सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे कर्णफुल प्रत्येकी ५ ग्रॅमचे, असा एकूण २ लाख ७0 हजारांचा ऐवज व त्यांच्या घराच्या शेजारी राहणार्या गजानन जाधव यांचे मालकीची दुचाकी क्रमांक एमएच-२८-२९८१ ही दुचाकी किंमत ३0 हजार रुपये, असा एकूण तीन लाखांचा ऐवज घेवून पोबारा केला. दरोडेखोर काळाशर्ट व तोंडावर रूमाल बांधून आले होते. या प्रकरणी दिगांबर वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३९२, ३८0, ३७९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून तपास एपीआय तावडे यांच्याकडे सोपविला आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
शेगावच्या वारकरीनगरात सशस्त्र दरोडा
By admin | Published: March 10, 2016 2:05 AM