दरम्यान, स्थायी समितीमधून आठ सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याऐवजी नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडीचा विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर सभापतींचा कार्यकाळ संपल्याने ९ मार्च राेजी सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयाेजन केले आहे. या निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी ८ मार्च राेजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी भाजपच्या विराेधात काँग्रेस,सेनेने आघाडी करीत सेनेच्या नगरसेविका प्रमिला पुंडलिक गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात महाविकास आघाडीमध्ये माेलाची भूमिका वठविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत पाच नगरसेवक आहेत. आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ताेंडसुख घेणाऱ्या भाजपसाेबत स्थानिकस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचे बाेलल्या जाते. त्यामुळे उद्या मंगळवारी स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सदस्य काेणाच्या बाजूने मतदान करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेकडून खुली ऑफर?
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. सभापतीपदासाठी विजयी उमेदवाराला नऊ मतांची गरज भासणार आहे. या समितीत १६ पैकी १० सदस्य भाजपचे असल्याने भाजपचा विजय निश्चित मानल्या जात आहे. अशास्थितीत काँग्रेस,सेनेने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाेबतच भाजपमधील तीन सदस्यांना खुली ऑफर दिल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत रंगत आल्याचे दिसत आहे.