लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये झालेल्या लुटमार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली.सरकारी बगीच्याजवळून जात असलेल्या एका व्यापाऱ्याची ३ लाख १२ हजार रुपये असलेली रोकड अज्ञात टोळक्याने पळविली होती. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेला या लुटमारीचा शोध लावण्यात यश आले. या लुटमार प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून या चोरीतील रोकड जप्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये जुने शहरातील रहिवासी अंकुश अरुण केवतकर, राजेश साहेबराव चव्हाण, राकेश दिलीप वाडेकर, नवीन प्रल्हाद पाली व वाशिम बायपासवरील रहिवासी रितेश लिंबादास मृदुंगे या पाच जणांचा समावेश आहे. या पाच आरोपींना अकोट रोडवरील एका गोदामाजवळ दरोड्याचा प्रयत्न करीत असताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, या पाच आरोपींनीच सरकारी बगीच्याजवळ व्यापाऱ्याची रोकड पळविल्याची माहिती समोर आली आहे.
लुटमार प्रकरणात आरोपी जेरबंद
By admin | Published: July 14, 2017 1:18 AM