अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या डिक्कीमध्ये घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या युवकास एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून एक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषिनगर येथील रहिवासी सूरज सुरेश वानखडे हा त्याच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडून अकोलाकडे येत असताना त्याला एमआयडीसी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर विमानतळासमोर अडविले. त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीच्या डिक्कीमध्ये एक घातक शस्त्र आढळून आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरुद्ध ४/२५ आर्म ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे. सूरज वानखडे याच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांनी दिली. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर तायडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.