लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना लुटणाºया एका अट्टल चोरट्यास रेल्वे पोलिसांनी मंगळवारी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वाशिम बायपास परिसरातील रूपचंद नगरातील राहणारा नागसेन महादेव खंडारे (३०) हा अकोला रेल्वेस्थानकावरून मध्यरात्रीदरम्यान विशेष रेल्वेगाड्यामध्ये आरक्षित तिकीट काढून बसायचा. रात्रीच्या दरम्यान प्रवासी झोपलेले असताना पाहून त्यांच्या बॅग लंपास करायचा. मागील काही महिन्यांपूर्वी शालीमार एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चोरीत नागसेन खंडारे याचा समावेश होता. रेल्वेगाड्यांमध्ये होणाºया चोऱ्यांचा छडा लावण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवली. त्याचे सीसी कॅमेºयातील चित्रण तपासून सर्वच रेल्वेस्थानक पोलिसांना पाठविण्यात आले होते.दरम्यान, चोरटा नागसेन खंडारे याला मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता भुसावळ येथून शालीमार एक्स्प्रेसमध्ये बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान रेल्वे पोलिसांना पाच बॅग, साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, १२ हजार रुपये किमतीची एक सोन्याची चैन आणि तोरड्याचा जोड असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ए.पी. दुबे, सहायक उपनिरीक्षक, एन.एस. जगताप, सहायक उपायुक्त प्रल्हाद सिंह, आरक्षक नीलेश वानखडे, मोहसीन शेख, विनोद कुमार, सिंटू कुमार, पंकज गवई, यांनी केली, अशी माहिती रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक विशेष नागर यांनी दिली. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:40 PM