एमआयडीसी पोलिसांची कारवाई; चार आरोपींकडून तूरडाळ जप्त
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मध्ये असलेल्या वर्धमान दालमिल येथून तुरीची डाळ चोरी करणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून ३० हजार रुपयांची तूरडाळ जप्त करण्यात आली आहे.
न्यू राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी संभव सुभाषचंद्र बिलाला यांच्या मालकीची एमआयडीसीमध्ये वर्धमान उद्योग दालमिल असून, या दालमिलमधून २२ पोते तूरडाळ चोरी गेल्याची माहिती त्यांना मिळाली. यावरून संभव बिलाला यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच सीसीटीव्ही फुटेज व माहितीवरून विजय देवीलाल गोयल (वय ४०, रा. शिवर) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर चार साथीदारांना सोबत घेऊन तूरडाळ चोरी केल्याची कबुली दिली. ही तूरडाळ पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली असून आणखी त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे, दयाराम राठोड, नीलेश भोजने, संतोष डाबेराव यांनी केली.