अकोला : जिल्ह्यात गहू पीक काढणीचा हंगाम सुरू आहे. चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा असताना गुरुवारी गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गहू उत्पादक चिंतेत पडले आहे. अवकाळीमुळे जिल्ह्याच्या काही भागात पिकांचे नुकसान झाले असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे.रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. सततचे दूषित हवामान शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. जिल्ह्यात २१ हजार ७९० हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड झाली आहे. अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने गहू पिकाचे नुकसान झाले आहे. तेल्हारा, अकोट तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. सततच्या अवकाळीने नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
गहू, हरभरा भिजला
पावसामुळे शेतकऱ्यांनी काढणी करून ठेवलेला गहू, हरभरा भिजला असून वारा सुटल्याने पिके जमिनीवर पडली आहे. आणखी काही दिवस हा अवकाळी पाऊस असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.