नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही वर्षांंमध्ये विद्यार्थ्यांंचा विज्ञान शाखेकडे कल वाढला आहे. करियरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि पालक विज्ञान शाखेला अधिक महत्त्व देत आहेत. विज्ञान शाखेविषयी असलेले आकर्षण केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंनासुद्धा आहे. यंदा दहावीमध्ये फ्रेश व रिपिटर मिळून २५ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि जिल्हय़ातील २३१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ३५ हजार ४४0 जागा आहेत. त्यामुळे यंदा कला, वाणिज्य शाखेच्या १0 हजार ३४८ जागा रिक्त राहणार आहेत. विज्ञान शाखेकडे वाढता ओढा पाहता, दरवर्षी जिल्हय़ात पाच ते सहा नवीन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांची भर पडत आहे. कला आणि वाणिज्य शाखेत शिकून करियर घडत नसल्याचा गैरसमज पालकांमध्ये पसरलेला आहे. प्रथम श्रेणीतील विद्यार्थी नाही, तर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्यार्थीही विज्ञान विषयांना महत्त्व देत आहे. विज्ञान शाखेत शिकून अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासोबतच कृषी अभियांत्रिकी, परिचारिका, डीएमएलटी, पशुवैद्यकीय, बीएससीकडे जाण्याचा विद्यार्थ्यांंचा कल असल्यामुळे कला, वाणिज्य शाखेचे महत्त्व कमी होत आहे. व्यवसायाला करियर म्हणुन बघणारे थोडेबहुत विद्यार्थी किंवा सीए म्हणून करियर करू इच्छिणारे विद्यार्थीच वाणिज्य शाखेला महत्त्व देत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे कला शाखेच्या तर सर्वाधिक जागा दरवर्षी रिक्त राहतात. विज्ञान शाखेची वाढती मागणी पाहता, शिक्षण विभागालासुद्धा विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी लागत आहे. कला, वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतरही या दोन्ही शाखेच्या १0 हजार ३४८ जागा रिक्त राहणार असल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
कला, वाणिज्य शाखेच्या दहा हजार जागा रिक्त राहणार!
By admin | Published: June 22, 2017 4:36 AM