अकोला : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यातही आशा स्वयंसेविकांच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.आशा स्वयंसेविकांना लसीकरण, सर्व्हे, आरोग्यविषयक प्रबोधन यासह विविध ७३ प्रकारची कामे करावी लागत असून, कामांच्या तुलनेत आशा स्वयंसेविकांना दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येते. आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन अत्यल्प असून, मानधनात वाढ करण्यासंदर्भात शासनामार्फत देण्यात आलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक राज्य कृती समितीच्यावतीने ३ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले. ४ सप्टेंबरपासून राज्यातील आशा स्वयंसेविकांनी कामावर बहिष्कारदेखिल टाकला आहे. त्यामध्ये मानधनात वाढ करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी आशा स्वयंसेविकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मानधन वाढविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. या मूक आंदोलनात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष राजन गावंडे, संध्या डिवरे, रुपाली धांडे, शितल दंदी यांच्यासह जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.
आशा स्वयंसेविकांनी केले मूक आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 5:55 PM