अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी घेऊन दिवसभर तैनात राहण्याचे फर्मान जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आशा स्वयंसेविकांना तर दिले, त्याचवेळी त्यांच्या मानधनाबाबत चकार शब्दाने उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे अल्प मोबदल्यात काम करणाºया या घटकांकडे लोकशाहीच्या महोत्सवातही दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण झाली.लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिलांना भेडसावणाºया समस्यांसाठी ‘हेल्प डेस्क’ पथक तैनात करण्यात आले. या पथकाद्वारे मतदारांना विशेष सोयी-सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोगाकडून उशिरा का होईना, मोबदला दिला जातो; मात्र त्यासाठी आयोगाने नियुक्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रात हेल्प डेस्क पथकामध्ये गावातील आशा वर्करचा समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे प्रथमोपचाराची जबाबदारी देण्यात आली. मतदानासाठी येणाºयांना उन्हाचा किंवा आरोग्यविषयक तक्रारी जाणवल्यास त्यांना तातडीने औषध देऊन उपचारासाठी पाठवणे, या कामासाठी आशा वर्करना तैनात ठेवण्यात आले. जिल्ह्यातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या उपविभागीय अधिकाºयांनी तसे पत्र सर्वच आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाºयांना दिले. आशा स्वयंसेविकांना मतदान केंद्रांची निश्चितीही करून देण्यात आली; मात्र निवडणूकविषयक कामासाठी नियुक्तीबाबत कोणताही कायदेशीर उल्लेख त्या पत्रात करण्यात आला नाही. त्यामुळे आशा वर्करना निवडणूक कामाचे मानधन मिळणार नाही. मतदान प्रक्रिया शासकीय काम असल्याने आशा वर्करनी ते विना मोबदला पार पाडावे, असेच संकेत त्या पत्रातून देण्यात आले. आशा स्वयंसेविकांवर होत असलेल्या या अन्यायाबाबत कोणीही आवाज उठवला नाही, हे विशेष.- गरोदर मातांना सकाळी मतदानाचे आवाहनउन्हाळ््याच्या दिवसात त्रास होऊ नये, यासाठी गावातील गरोदर मातांनी सकाळी १० वाजतापूर्वी मतदानाला यावे, असे निरोपही आशा स्वयंसेविकांकडून देण्यात आले. सतत तीन दिवस तशी मोहीम प्रत्येक गावात राबवण्यात आली. जिल्ह्यातील आशा वर्करनी विशेष मोहिमेद्वारे कामे केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय आर.जाधव यांनी दिली.