लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक सोनोने यांची निवड करण्यात आली असून, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांचा प्रदेश कार्यकारिणीत सल्लागार म्हणून समावेश करण्यात आहे. अकोल्यातील माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे यांचाही प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाला आहे. अकोला व बुलडणा जिल्हाध्यक्षांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाल्याने या दोन जिल्हयाला नवे चेहरे मिळणार आहेत.भारिप-बमसंच्या प्रदेश कार्यकारिणीचे गठन गेल्या अनेक वर्षांपासून झाले नाही. त्यामध्ये असलेल्या पदाधिकार्यांच्या बैठकाही क्वचितच झाल्या. आधीच्या कार्यकारिणीत अकोल्यातील डी.एन. खंडारे, दिलीप तायडे यांचा समावेश होता. मात्र, कार्यकारिणीची बैठकच होत नसल्याने नवीन रचना करण्याची मागणीही सातत्याने पुढे आली. दरम्यान, २0१४ नंतर निवडणूक विषय मागे पडला. आता २0१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे पक्षाचे कामही वेगात येणार आहे. त्यापूर्वी पक्षाची प्रदेश कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने (खामगाव) यांची नियुक्ती झाली. महासचिवपदी औरंगाबादचे अमित भुईगळ, कुशल मेश्राम, मार्गदर्शक मंडळामध्ये पक्षाचे कार्यालयीन सचिव ज.वि. पवार, आमदार बळीराम सिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे यांचा समावेश आहे. कोषाध्यक्षपदी मनोहर सोनवणे, तर पक्षाच्या विद्वत सभेमध्ये पुणे येथील प्राचार्य म.ना. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
बिनकामाच्या प्रभारामुळे अडचणभारिप-बमसंच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकाच होत नसल्याचा यापूर्वीच्या पदाधिकार्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते पदाधिकारी धड प्रदेशचे नाहीत, तर धड जिल्ह्याचेही राहत नाहीत. जिल्ह्यातील कार्यकर्तेही त्यांना विचारत नाहीत. हा अनुभव आल्याने गेल्या काळात काहींना नैराश्यही आले होते.
जिल्हा कार्यकारिणीवर प्रश्नचिन्हपक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त समजल्या जातात. मात्र, भारिप-बमसंमध्ये तसे घडत नाही. तरीही येत्या काळात जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष सोनोने, मार्गदर्शकांमध्ये आमदार सिरस्कार यांचा समावेश झाल्याने त्यांची जिल्हाध्यक्ष पदे रिक्त झाली आहेत. त्या पदांवर नव्या चेहर्यांना संधी मिळणार की रिक्त ठेवली जाणार, याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.