- संजय खांडेकर
अकोला : भारिप नेते आणि वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान यांच्या गूढ हत्येचा फटका अकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलाल आणि काही प्रॉपर्टी गुंतवणूकदारांना बसला आहे. झीरोमध्ये आर्थिक व्यवहार असलेल्या हुंडीचिठ्ठी दलालांचा आणि कोट्यवधीची रक्कम आसिफ यांचे सोबत प्रॉपर्टीत गुंतविलेल्या व्यापाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे आणि तिच्या मुलांनी आसिफ खान यांची हत्या केल्याची कबुली दिली; मात्र अद्याप पोलिसांना मृतदेह मिळालेला नाही.मृतदेह मिळण्यावर या तपासाची गंभीरता आणि दिशा अवलंबून आहे. सोबतच ज्या व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी आसिफ खानसोबत आर्थिक व्यवहार केलेले आहेत ते चांगलेच कोंडीत सापडले आहे. अकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलालांनी आसिफला पन्नास लाखाची रक्कम व्यवहारासाठी दिली होती. हा सर्व व्यवहार झीरोचा असल्याने हुंडीचिठ्ठी दलाल आणि रकमेचे मूळ मालक हादरले आहेत. धनादेश तर आहे, मात्र बोलावे कुणाशी, याबाबत ते संभ्रमात सापडले आहेत; तसेच शहरातील मोक्याच्या प्लॉट खरेदी व्यवहारात आसिफ खानसोबत काही व्यापाºयांची भागीदारी होती. यापैकी काहींचे व्यवहार रेकॉर्डवर आहेत, तर काहींचे व्यवहारदेखील रेकॉर्डवर नाहीत, त्यामुळे आता पुढे काय करावे, अशा विचित्र पेचात ते सापडले आहेत. दरम्यान, आसिफ खान यांचा मृतदेह मिळाला तर गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळेल. वारसदार लगेच समोर येतील आणि आसिफ खान यांनी अकोल्यात व्यापारी-भागीदारांसोबत केलेली आर्थिक व्यवहाराची परिपूर्तता करतील, अशी अपेक्षा आहे; मात्र ही अपेक्षा कितपत पूर्ण होते की रक्कम बुडते,याबाबत शंकाच आहे. हुंडीचिठ्ठी दलालांचे पन्नास लाख आणि इतर जंगम मालमत्तेतील भागीदारी पकडून दोन कोटींचे व्यवहार आहेत. त्यामुळे आसिफ खान यांच्या हत्येमुळे अकोल्यातील व्यापारी आणि हुंडीचिठ्ठी दलालांना दोन कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.