- राजरत्न सिरसाट
अकोला: मतदारसंघातील इच्छुकांनी मंगळवारी अकोला येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांनी वंचिततर्फे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या वाढत आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमदेवारांच्या यादी जाहीर होत असून, अनेक इच्छुकांचा त्यातून भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे अशा नाराज उमेदवारांनी आता वंचितकडून निवडणउकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असल्याने वंचितच्या आगामी यादीत अनेक आश्चर्यजनक नावांचा समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता. आता पुढील दोन टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रातील मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेने वेग धरला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघाचा यात समावेश आहे. या मतदार संघातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी आता स्वपक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेणे सुरू केले आहे.
अशा नाराज इच्छुकांना वंचितकडून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा ठेवून अनेकांनी आंबेडकर यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात सांगली व शिर्डी येथील इच्छुकांचा समावेश आहे. गेले दोन दिवसात या मतदारसंघातील इच्छुकांनी आंबेडकर यांची भेट घेतली आहे.