मूर्तिजापूर : तालुक्यातील शेलू बोंडे येथील पारधी बेड्यावर पाणी भरण्याच्या वादातून चौघांवर लाठी काठी व लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना ११ मे रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संतोष पवार याचा अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
शेरसिंग ग्यानू पवार (४०) रा. पारधीबेडा शेलू बोंडे यांनी १२ मे रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार शेरसिंग पवार हे येथील सार्वजनिक बोअरवेलवरुन घरापर्यंत टाकल्या पाईप लाईन मधून घरी पाणी भरण्यासाठी गेले असता सदर बोअरवेलवरुन दुसरीकडे पाणी चालू असता बोअरची चावी जेसवाल कंट्रोल चव्हाण याच्याकडे असल्याने त्याला आमच्या घरी पाणी सोडण्याची विनंती केली. परंतु घरी पाणीच नसल्याने सदर कॉक आमच्याकडे चालू करुन घरी परत आलो असता जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसींग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार यांनी घरी येऊन शेरसिंग ग्यानू पवार, संतोष पवार, मीतवा पवार, सागर पवार यांच्यावर लाठ्या काठयांनी व लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेरसिंग ग्यानू पवार, संतोष पवार. मितवा पवार, सागर पवार हे चौघेजण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात तर गंभीर जखमी संतोष पवार याची प्रकृती चिंताजनक होती. दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसींग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार रा. पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या विरुद्ध ३०७, ३२४, अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे.