हातरुण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युसुफ शहा बिस्मिल्ला शहा त्याचा मुलगा आसीफ शहा युसूफ शहा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. २६ जुलै २०१० रोजी अर्जाचे छाननी होती. दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवाराने टॅक्सच्या पावतीला धरून आक्षेप नोंदवला होता. त्यावर पिता-पुत्रांनी तीन दिवसांपूर्वीच टॅक्स भरल्याचे सांगितले होते; मात्र आरोपीने २४ तासांपूर्वीच टॅक्सची रक्कम दिल्याचे ग्रामसेवकाने सांगितल्याने आरोपींनी आक्रमक होत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणात ग्रामसेवक अनंत दिगंबर महल्ले यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ३३३, ३५३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्ष व आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने वडील आरोपीचे वय लक्षात घेता त्यास तीन वर्षांची शिक्षा ठोठावली, तर आरोपी मुलाला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला; बापाला तीन वर्षांची, तर मुलाला पाच वर्षांची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:45 AM