अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणारा त्याच्याच शाळेतील एका १५ वर्षीय विद्यार्थ्यास पोलिसांनी रविवारी सकाळी ताब्यात घेतले. गंभीर जखमी असलेल्या उज्जेर हसन खान याच्यासोबत त्याचा शाळेत किरकोळ वाद झाल्यानंतर या किरकोळ वादाचा बदला या विद्यार्थ्याने रक्तरंजित रंग देऊन काढल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे आता पालकांवर मुले सांभाळण्याची मोठी जबाबदारी आली असून, त्यांच्यातील किरकोळ वाद सहज न घेता ते सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.पातूर येथील रहिवासी अफसर खान छोटे खान यांचा मुलगा उज्जेर हसन खान हा गीता नगर परिसरातील सेंट अॅन्स शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो अकोल्यात रहिवासी असून, त्याच्यावर शनिवारी दुपारी याच शाळेतील एका विद्यार्थ्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. तत्पूर्वी हल्लेखोर विद्यार्थ्याने त्याच्या एका मित्राला बोलावून त्याची दुचाकी घेतली. त्यानंतर त्या दुचाकीवर उज्जेर याला घेऊन इचे नगरातील जंगलात गेला. या जंगलात त्याने उज्जेरच्या डोक्यावर शाळेतील वादातून लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेला मुलगा जंगलात पडून होता. काही लोक या परिसरात गेले असता त्यांना हा मुलगा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलाला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असून, तो बेशुद्धावस्थेत आहे; मात्र पोलिसांनी तपास करताना त्याच्या तीन मित्रांची कसून चौकशी केली. यामधील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची विचारपूस केली असता ताब्यातील एकाने शाळेतील वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. उज्जेर या मुलावर हल्ला करणारे हे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. माय-बापांनो, लेकरं सांभाळालहानपणापासून मुलांचे हट्ट पुरविणारे आई-वडील त्यांच्यावर प्रेमाचा अतिरेक करीत असल्याने मुले गुन्हेगारी प्रवृत्तीचे होत आहेत. वयात येत असलेल्या मुलांच्या शरीरातील अंतर्गत होत असलेले बदल तसेच सहकारी विद्यार्थ्यांशी त्यांची असलेली वागणूक तपासण्याची गरज आता पालकांवर आलेली आहे. मुलांचे वाद हे किरकोळ न घेता ते जाणून घेऊन तातडीने समेट घडविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यावा, अन्यथा उज्जेरसारख्या विद्यार्थ्यांवर हे हल्ले होतच राहणार आहेत. बालगुन्हेगारी प्रचंड वाढतेयजिल्ह्यात बालगुन्हेगारी प्रचंड वाढत असून, याकडे आई-वडिलांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा पोलीस खात्यात आहे. आई-वडील दोघेही नोकरी करणारे असल्याने मुलांकडे लक्ष देण्यात वेळच नसल्यामुळे ही मुले गुन्हेगारी प्रवृत्तीचे होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ज्या मुलांचे आई-वडील दोघेही नोकरी करतात, त्यांची मुलेच प्राणघातक हल्ला, चोरी, मारहाणसारख्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मुलांवर संस्कार न करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे तसेच प्रेमाचा अतिरेक करणाऱ्या आई-वडिलांची मुले आधी हट्टी होतात आणि नंतर ती गुन्हेगारी करण्याक डे वळत असल्याची माहिती आहे.