अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्लॉटच्या आर्थिक वादातून हत्या
वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष ज्योती अनिल गणेशपुरे व आसीफ खान मुस्तफा खान यांनी पार्टनरशीपमध्ये प्लॉट व फ्लॅटसह शेती खरेदी केलेली आहे. गत चार वर्षांपासून या दोघांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही समोर आले आहे; मात्र गत काही दिवसांपासून एका प्लॉटच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाले. याच वादातून आसीफ खान यांची हत्या झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासोबतच या हत्या प्रकरणाला आणखी काही कंगोरे असले, तरी पोलिसांकडे त्याचे पुरावे नसल्यामुळे पोलीस अधिकाºयांनी त्या विषयावर बोलण्याचे टाळले.हत्येला अपघाताचा बनावआसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला, त्यानंतर आसीफ खान यांची एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाची कार नदीत लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सदर कार चिखलात फसल्यामुळे ती नदीत लोटण्याचा प्रयत्न फसला. यातच हत्येचा अपघात बनविण्याचा डावही अयशस्वी ठरल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. या हत्याकांडानतर अपघात दाखविण्याचा बनाव सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील आमला येथे केली हत्या!अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आमला या गावात ज्योती गणेशपुरे हिची बहीण रहिवासी आहे. याच ठिकाणी आसीफ खानला बोलावून आमला गावातच त्यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. ज्योती अनिल गणेशपुरे, वैभव अनिल गणेशपुरे व स्वप्निल नितीन वानखडे या तिघांसोबतच आणखी तीन आरोपींचा आसीफ खानच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचेही समोर आले आहे.कारमधील रक्ताचे नमुने घेतले!आसीफ खान यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांचीच एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाच्या कारमध्ये म्हैसांग येथील पूर्णा नदीवर आणण्यात आला. सदरचा मृतदेह एका चादरमध्ये गुंडाळून आणण्यात येत असताना आसीफ खानच्या रक्ताचे डाग कारमध्ये दोन ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.
रक्त नमुने जुळविण्यासाठी ‘डीएनए’चा पर्यायकारमध्ये आढळलेले रक्ताचे डाग हे आसीफ खानचेच आहेत का, यावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी आसीफ खान यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीचे रक्त नमुने घेऊन डीएनए करण्याचा पर्याय पोलिसांकडे खुला असून, त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत; मात्र त्यापूर्वी मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
प्रतिकारातील चाकू जप्तआसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली. या प्रतिकारात आसीफ खानने चाकूने हल्ला केल्यामुळे ज्योती गणेशपुरे यांच्या गळ्यावर मोठी जखम झाली आहे, तर त्यांचा मुलगा वैभवही जखमी झाला आहे. सदरचा चाकू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.