महान (जि. अकोला) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत साहाय्यक पशुधन विकास अधिकार्याने एका पशुपालकाकडे उपचार करण्यासाठी लागणार्या औषधीकरिता ५00 रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे, तर याप्रकारामुळे संतत्प झालेल्या ग्रामस्थांशीही हुज्जत घातल्याचा प्रकार गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी येथे घडला. स्थानिक पशुपालक पुरुषोत्तम दत्तात्रय भडांगे हे गुरुवारी सकाळी त्यांच्या मालकीच्या म्हशीवर उपचार करवून घेण्यासाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले. तेथे कार्यरत असलेले साहाय्यक पशुधन विकास अधिकार्याने म्हशीवर उपचार केले नाहीत. त्यांनी म्हशीवर उपचारासाठी लागणार्या औषधांसाठी ५00 रुपये देण्याची मागणी केली, अशी माहिती पुरुषोत्तम भडांगे यांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना दिली. त्यामुळे संतप्त झालेले सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ सकाळी ११.३0 वाजता याबाबत विचारण्यासाठी भडांगेसोबत पशुवैद्यकीय दवाखान्यात पोहोचले. तेव्हा सदर अधिकारी दवाखान्यात अंडरवियरवर झोपले होते. त्यामुळे आलेल्या लोकांनी त्यांना उठविले असता ते तंद्रीतच असल्याचे जाणवले. ते पॅन्ट घालून बनियानवरच खुर्चीत येऊन बसले. झालेल्या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी कधी दवाखान्यात औषधी उपलब्ध नाही, तर कधी त्यांना नोकरीची गरज नाही, अशी उत्तरे दिली. तसेच अज्ञात अधिकार्यांना मोबाइलवरून कॉल करून हे लोक मला मारायला आले, असे सांगितले. यावेळी लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा व त्यांनी पशुपालकाला काय म्हटले व कां म्हटले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते माझी कुठे तक्रार करायची ती करा. मी कायमस्वरूपी डॉक्टर नाही, माझ्याकडे महान गावाचा प्रभार दिला गेला आहे, अशी उत्तरे देत होते. हा गोंधळ तब्बल अडीच तासपर्यंत चालला. अखेर जमावातील जबाबदार लोकांनी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्यांना झालेल्या प्रकार कळविला. तसेच याबाबत महान पोलीस चौकीतील अधिकार्याला फोन करून माहिती दिली. त्यावेळी सदर अधिकार्याने पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप लावले. त्यानंतर पशुपालक पुरुषोत्तम भडांगे याबाबतची तक्रार बाश्रीटाकळी पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकार्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
साहाय्यक पशुधन विकास अधिका-याने उपचारासाठी केली पैशांची मागणी
By admin | Published: October 02, 2015 2:19 AM