अकोला: कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यास सहायक पोलीस निरीक्षकाने वरिष्ठ अधिकारी असल्याच्या तोर्यात शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन पोलीस चौकीजवळ घडला. याप्रकरणी पोलीस कर्मचार्याने रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही दिवसांपूर्वी सहायक पोलीस निरीक्षक राजू भारसाकळे यांची ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या जागेवर दहीहांडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी नियुक्ती झाली. भारसाकळे हे बुधवारी रात्री बाहेरगावहून आले. ते रेल्वे स्टेशनसमोरील रामदासपेठ पोलीस चौकीजवळ थांबले. या ठिकाणी रामदासपेठचे पोलीस नाईक वसंत निखाडे कर्तव्यावर होते. भारसाकळेंना ते ओळखत नसल्याने, त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजू भारसाकळे यांना तेथून जाण्यास सांगितले. एक पोलीस कर्मचारी आपल्यासारख्या पोलीस अधिकार्याला जाण्यास सांगतो. अशी भावना एपीआय भारसाकळे यांची झाली. स्वाभिमान दुखावल्या गेल्याने भारसाकळे यांचे पित्त खवळले. त्यांनी पोलीस नाईक वसंत निखाडे यांचा पाणउतारा करण्यास सुरुवात केली आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केली. बराच वेळ दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांमधील वाद विकोपाला जात असल्याचे पाहून उपस्थित पोलीस कर्मचार्यांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडविला. अश्लील शिवीगाळ केल्यामुळे पोलीस नाईक वसंत निखाडे यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात ठाणेदार सुभाष माकोडे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद घेण्यात आली. ठाणेदार माकोडे यांनी झालेला प्रकार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कानावर घातला. सहकारी कर्मचार्यासोबत एका अधिकार्याने केलेले गैरवर्तन गंभीर असून, त्याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे नुकतेच दहीहांडा ठाणेदारपदी रुजू झालेले एपीआय भारसाकळे यांच्यावर काय कारवाई होते, याकडे पोलीस विभागाचे लक्ष लागले आहे.
पोलीस कर्मचा-याशी सहायक पोलीस निरीक्षकाची दादागिरी!
By admin | Published: February 19, 2016 2:08 AM