अकोला: केंद्रात सत्ता दिल्यास देशात समान नागरी कायदा लागू करण्यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम व अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. मागील चार वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या मुद्यावर भाजपने सोयीस्कर चुप्पी साधली. भाजपच्या वचननाम्यात रामराज्याचा उल्लेख होता. त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ता, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘विश्व’ सांभाळण्यापेक्षा काही परिषदांनी स्वत:च्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना सामावून घेणे अपेक्षित होते, असा टोलाही त्यांनी काही हिंदू संघटनांचा नामोल्लेख न करता लगावला.शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप तसेच कुटुंबातील महिलांना साडी-चोळी देऊन बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देत असताना राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवरही निशाणा साधला. शेतकºयांना भेडसाविणाºया विविध प्रश्नांवर शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरीही शिवसेनेने शेतमालाची खरेदी प्रक्रिया, हमीभाव व थकीत चुकारे अदा करण्यासाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने छेडल्याचे खा. सावंत यांनी सांगितले. आगामी दिवसांतही सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस खरेदीसह हमीभावाच्या मुद्यावर शिवसेना कायम शेतकºयांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत उग्र आंदोलनाचे संकेत दिले.