नितीन गव्हाळे, अकोला: दिल्ली येथील शपथविधी सोहळा आटोपून नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे मंगळवारी अकोल्यात परतले. अकोल्यात येताच, त्यांनी रेल्वे स्टेशनचा दौरा करून रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे स्टेशनवरील पार्किंगची समस्या मार्गी लावून वाहतूकही वन वे करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी महावितरण, कृषि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. तसेच सौरउर्जा योजनेच्या माध्यमातून ६० हजार शेतकऱ्यांना विज उपलब्ध करण्याचेही बजावले.
खासदार अनुप धोत्रे यांनी शंभर दिवसांच्या कामाचा रोड मॅप तयार केला असून, त्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांनी रेल्वे स्थानकावर भेट देऊन रेल्वे विभागातील विद्युत, बांधकाम, पोलिस अधिकारी व वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नागरिकांच्या दृष्टीकोनातून समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. पोलिस अधिकारी, ऑटो चालक, रेल्वे कर्मचारी यांच्याशी चर्चा करून पार्किंगची समस्या निकाली काढण्याच्या सूचना केल्या. विकास कामांचा आढावा घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तसेच दक्षिण आणि मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर खासदार अनुप धोत्रे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत, शेतकऱ्यांना खतांची तुटवडा होऊ नये. त्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासाेबत माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, गिरीश जोशी, अक्षय जोशी, मोहन पारधी, राघव टाले, महेंद्र गोयंका, रवी शर्मा, केशव ताथोड, स्टेशन मास्तर संतोष कवळे, शहर वाहतूक निरीक्षक सुनिल किनगे, जीआरपी ठाणेदार अर्चना गाढवे, आरपीएफचे ठाणेदार युनूस खान उपस्थित होते.
रेल्वे स्टेशनवरील पार्किंगची समस्या मार्गीखासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे विभागातील विविध विकास कामे व दैनंदिन कामकाजाबाबत पाहणी केली. तसेच रेल्वे स्टेशन वरील पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेतला. अधिकारी, प्रवाशी, ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासह रेल्वे स्टेशनच्या आत व बाहेर जाण्याचा मार्ग वन वे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.