अकोला : बँकेतून बोलत असून, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, केवायसी अपडेट न केल्यामुळे कार्ड ब्लॉक केले. महावितरण बोलत असून, तुम्ही विजेचे बिल भरलेले नाही. त्यामुळे लाइन कट करू असे सांगून अज्ञात व्यक्तींकडून मोबाईल मॅसेज व लिंक पाठवून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते आणि येथे आपली फसवणूक होते. या ॲपवर क्लिक करताच किंवा ॲप डाऊनलोड करताच, आपल्या बँक खात्यातील रक्कम काढून फसवणूक केली जाते. असे वाढले असून, दररोज कोणाची ना कोणाची फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत.
याबाबत सायबर सेलकडे तक्रारीसुद्धा येत आहेत. अज्ञात व्यक्ती फोन करून डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतात. अनेकजण ढोबळमानाने ही माहिती देतात आणि फसतात. काही वेळातच, त्यांच्या बँक खात्यातील पूर्ण रक्कम किंवा थोडी-थोडी रक्कम काढून घेतली जाते. गत पाच महिन्यांमध्ये ५७ जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये केली आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून महिला, ज्येष्ठ नागरिकांना अधिक टार्गेट केले जाते. एवढेच नाही तर शिकले सवरलेलेसुद्धा याला बळी पडत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.
गत पाच महिन्यांत ५७ जणांची फसवणूक
गत पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गत एटीएम कार्ड, वीज बिल, बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहे. पाच महिन्यांमध्ये ५७ जणांनी बँक खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. तक्रारींनुसार पोलिसांकडून कारवाई करून अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
चार तक्रार येत आहेत दररोज
शहरासोबतच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये ऑनलाइन फसवणूक झाली. बँक खात्यातून पैसे काढल्याच्या तक्रारी करण्यात येतात. कमीतकमीत दररोज फसवणूक करण्यात आल्याच्या ४ तक्रार प्राप्त होत असल्याचा अंदाज आहे. तसेच काहीजण घटना घडल्यानंतर लगेच, सायबर सेलकडे तक्रार करीत आहे. यावर सायबर सेलकडून तातडीने कारवाई करून गेलेली रक्कम तक्रारदारास परत मिळवून दिली जाते.
आठ तक्रारी प्रलंबित
ऑनलाइन फसवणूक केल्याच्या दर दिवसाला तीन ते चार तक्रारी येतात. यापैकी काही तक्रारींचा निपटारा करण्यात येतो. तशा फसवणूक केलेल्या तक्रारींचा संख्या फार कमी आहे. जवळपास ८ ते १० तक्रारी सायबर सेल, पोलीस ठाण्यांकडे प्रलंबित आहेत.