पातुर तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या पांढुर्णा येथील पत्रकार अमोल सुखदेव सोनोने यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. अंधारसांगवी परिसरातील निर्गुणा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरु असल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’ मध्ये १७ जानेवारी रोजी प्रकाशित करताच परिसरातील रेती माफियांचे पित्त खवळले. त्यानंतर रेती माफियांनी पांढुर्णा-मळसूर फाट्यावर वृत्तपत्राची पार्सल आणण्यासाठी गेलेले पत्रकार अमोल सोनवणे यांच्यावर हल्ला केला. तसेच जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली. या हल्ल्यामध्ये पत्रकार अमोल सोनवणे जखमी झाले. पत्रकार अमोल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चान्नी पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादविच्या 324, 506 ,504 ,34 कलमान्वये आलेगाव येथील आरोपी सचिन करपे, रामेश्वर डाखोरे, आकाश मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी १९ जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी १९ जानेवारी रोजी घटनास्थळाला भेट दिली, असून, पुढील तपास सुरू आहे.
पत्रकारावर हल्ला; आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:19 AM