अकोला : नागपूर येथून अकोल्यात गुटखा येत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सापळा रचून एमआयडीसीतील हत्ती पुतळ्याजवळ गुटखा पकडण्याचा प्रयत्न करताच गुटखा माफियांनी सदर वाहन थेट पोलिसांच्या अंगावर नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करताच बाळापूरनजीक हे वाहन पकडण्यात आले असून, त्यामधून १२ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त क ेला आहे.शहरातील जुन्या भाजी बाजारातून विनोद नामक गुटखा माफिया विमल गुटख्याची मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने विक्री करतो. या गुटखा माफियाचे साथीदार अब्दुल नईम अब्दुल रफीक रा. बाळापूर आणि अजमत खान सलाउल्ला खान रा. बाळापूर हे दोघेही बोलेरो वाहनातून नागपूर येथून गुटखा घेऊन येत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने दोन दुचाकीने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हस्ती पाइप येथे सदर वाहनावर पाळत ठेवली. बोलेरो वाहन येताच पोलिसांनी सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने गुटखा साठा भरून असलेले वाहन पोलिसांच्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र विशेष पथकातील कर्मचारी विसपुते व दुसरा पोलीस कर्मचारी पळाल्याने या वाहनाच्या अपघातातून वाचले. त्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. जिल्ह्यात लगेच नाकाबंदी करण्यात आली. बोलेरो वाहनाचा पाठलाग चारही पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरू केला असता वाहन सरळ बाळापूरनजीक नेण्यात आले. या ठिकाणी बाळापूर महामार्ग सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना पाहून वाहन चालकाने वाहन तातडीने परत अकोल्याकडे वळविले; मात्र पाठीमागेच असलेल्या विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचाºयांनी रस्त्यावर वाहनांचा ‘जाम’ लावून गुटख्याचा साठा असलेले वाहन जप्त केले. या वाहनातून तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुटखा माफियांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७, ३५३ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.