- नितीन गव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्ककोरोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्र सुरू करावे की नाही, याविषयी चर्चा सुरू आहे; परंतु अकोला जिल्ह्यातील परिस्थिती पाहता, शाळा सुरू करणे योग्य नाही. त्यामुळे शालेय विद्यालयांना घरच्या घरी कसे शिक्षण देता येईल. या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. आॅनलाइन शिक्षण हा पर्याय असला तरी, त्यात तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे, असे जिल्हा शैक्षणिक व गुणवत्ता विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे यांनी सांगितले. डॉ. डुकरे यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद...
आॅनलाइन शिक्षणात अडचणी असल्यामुळे मुलांना कसे शिक्षण उपलब्ध होईल?राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेमार्फत दीक्षा अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून आणि रेडिओ, टीव्हीद्वारे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे. एक चॅनेलसुद्धा करण्यात येत आहे. ११ जुलैपासून जिल्ह्यात आॅनलाइन शिक्षणास सुरुवात होईल. आॅनलाइन शिक्षण देताना, अडचणी आहेत. अनेक मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. अशांना साध्या फोनवर आॅडिओच्या माध्यमातून शिक्षण देऊ. शिक्षण तज्ज्ञांचे काही व्हिडिओ तयार केले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून शिक्षण देता येईल, तसेच आता जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. पालकांनीसुद्धा पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्र्थ्यांना घरच्याघरी शिक्षण द्यावे, त्यासाठी शिक्षक मार्गदर्शन करतील.
आॅनलाइन शिक्षणासाठी डाएटचे काय नियोजन आहे?शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश दिले असले तरी जिल्ह्याची गंभीर परिस्थिती पाहता, शाळा सुरू करणे योग्य नाही. सध्या फिजिकली शैक्षणिक सत्र सुरू करणे शक्य नाही; परंतु आॅनलाइन शैक्षणिक सत्राच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी डाएटने नियोजन केले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे दोन टास्क फोर्स तयार करण्यात आले आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. अशा भागात शाळा सुरू करता येतील. आॅडिओ मोबाइलच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. आॅडिओ, व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आल्या आहेत.
इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या कशा पद्धतीने घेणार?इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आॅनलाईन माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. संपादणूक चाचणी, अध्ययन निष्पत्तीवर आधारित चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांना लिंक देऊन वस्तूनिष्ठ प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगली तयारी होईल. तसेच आॅडिओ, व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण, तसेच तज्ज्ञांचे आॅनलाईन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याविषयीचे नियोजन करण्यात येत आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागासोबतच डायएचे शिक्षक सुद्धा नियोजन करीत आहेत.
दुर्गम, ग्रामीण भागात आॅनलाईन शिक्षण कसे पोहोचणार?आॅनलाईन शिक्षण देताना, अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, टिव्ही नाहीत. नेटची सुविधा नाही. या अडचणी आहेत. परंतु त्यातून कसा मार्ग काढता येईल. याचा राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणेच्या माध्यमातून विचार सुरू आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे. यासाठी आॅडिओ क्लिप तयार करण्यात आल्या आहेत. सध्या पाठ्यपुस्तके सुद्धा वितरीत करण्यात आली आहेत. शिक्षकांनी आॅडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांच्या अभ्यासाविषयी पालकांना शिक्षकांनी सूचना कराव्यात. त्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी शिक्षकांनी सर्वस्तरातून प्रयत्न करावे.
कोरोना संकटात शाळा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने, शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आॅनलाइन आणि अडचणींशिवाय कसे शिक्षण घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अडचणी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न करू -डॉ. समाधान डुकरे