अकोला : केवळ बोलीभाषा जाणणाऱ्या आदिवासी मुलांना मराठी वाचता, लिहिता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत ही मुलं कोसो दूर राहतात ; अशीच काही मुलं अकोट, तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागात असल्याचे उन्नती संस्थेच्या निदर्शनास आले अन् त्यांनी देवनागरी लिपीच्या सहाय्याने कोरकू या बोलीभाषेतून मराठी शिकविण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला, ज्यामुळे येथील कोरकू आदिवासी मुलं वर्षभरात मराठी बोलू व वाचू लागली.‘उन्नती’च्या या प्रयोगाची खरी सुरुवात झाली, ती मेलजोल या संस्थेच्या कामकाजातूनच. सन २००९ ते २०१३ या कालावधीत मेलजोल या संस्थेचे अकोट, तेल्हारा तालुक्यातील शहानूर, मलकापूर, बोजी, बोरवा या आदिवासीबहुल गावांत सर्वेक्षणाचं काम सुरू होतं. दरम्यान, येथील मुलं शिकत नसल्याचे शरद सूर्यवंशी यांच्या निदर्शनात आले. काही दिवसांनी ते काम संपलं; पण शरद सूर्यवंशी यांनी आपल्या जुन्या सहकार्यांच्या मदतीने २०१४ मध्ये या गावांमध्ये पुन्हा सर्व्हे केला, त्यानुसार ८५ टक्के मुलांना गरजेनुसार वाचता, लिहिता येत नसल्याचं सष्ट झालं. येथील शाळेत मराठी शिकवतात; पण मूळ कोरकू बोलीभाषीक या आदिवासी मुलांना मराठी समजत नव्हतं. त्यामुळे ते निट शिकूही शकत नव्हते. या मुलांना शिकता यावं, म्हणून त्यांनी कोरकू बोलीभाषेला मराठीची जोड दिली. कोरकू साहित्याला देवनागरी लिपीत शब्दबद्ध केले. त्यांच्या या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा फायदा असा झाला, की काही दिवसातच ही आदिवासी मुलं मराठी वाचू व लिहू लागली. शालेय पाठ्यपुस्तकातले धडे ते समजू लागले. कोरकू बोलीभाषा अन् देवनागरी लिपीचा हा मेळ खऱ्या अर्थाने आदिवासी मुलांसाठी ‘उन्नती’चा ठरला.चार गावातील ६० मुलांना लाभउन्नती संस्थेच्या या प्रयत्नामुळे वर्षभरातच मोठा क्रांतिकारी बदल दिसून आला. अकोट, तेल्हारा तालुक्यातील चार गावांमध्ये तब्बल ६० विद्यार्थी मराठी गरजेनुसार वाचायला व लिहायला लागली.शिक्षण विभाग मात्र उदासीनच‘उन्नती’च्या या क्रांतिकारी बदलाचा उत्साह वाढविण्याऐवजी जिल्ह्याच्या शिक्षण विभागानं उदासीन धोरणच स्वीकारणे पसंत केलं. अखेर उन्नती संस्थेने अमरावती जिल्ह्याच्या डाएटच्या मदतीने ही किमया करून दाखवली.इतरही बोलीभाषांना देणार मराठीची जोडकोरकू साहित्याची शंभर पुस्तके शब्दबद्ध केल्यानंतर आता राज्यातील राठी, पारधी, गोंड, तावडी, कोळी यांसह इतर आदिवासी बोलीभाषांनाही देवनागरीची जोड देण्याचे क्रांतिकारी पाऊल उन्नती संस्थेने उचलले आहे.पुस्तकात या साहित्याचा समावेश‘उन्नती’च्या माध्यमातून शंभर पुस्तकांमध्ये कोरकू साहित्य मराठीत आले. यामध्ये ‘खुशिटे इठुबा’ हे कोरकू भाषेतील उजळणीचे पुस्तक असून, यामध्ये कोरकू शब्दकोष चित्र स्वरूपात दिलेला आहे, तसेच कोरकू जीवनाशी निगडित वाचनपाठ, अक्षर ओळख, अक्षर वळण, लेखन, वाचन यासंदर्भात सविस्तर माहिती आहे. कोरकू भाषांतरीत गोष्टी, कविता, बोलीभाषेतील गीतांचा समावेश आहे.आगामी काळात इतर बोलीभाषांनाही मराठीची जोळ देऊ, शिवाय आदिवासी भागातील शाळांमधील शिक्षकांना या साहित्यांतर्गत मार्गदर्शन केले जात आहे. आगामी काळात आदिवासी विद्यार्थ्यांना याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, हे नक्की.- शरद सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी, उन्नती संस्था.