सावरगाव-झरंडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अपहार केल्याची चौकशी करण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. सावरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षांपासून ग्रामपंचायतीचा प्रभार दिला नाही. ते झरंडी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असून, ग्रामपंचायतीला पाणी फाउंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखांच्या पारितोषिकातून कामे न करता या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ताले यांनी केला होता. परंतु, संबंधितांकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाही किंवा चौकशी केली नाही. त्यामुळे ताले यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पातूर व चान्नी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो:
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
विजयकुमार ताले यांचा पातूर आणि चान्नी पोलीस शोध घेत होते. आत्मदहनाच्या वेळेस अनुचित प्रकार घडू नये यासाठी ताले यांना ताब्यात घेण्यासाठी पातूरचे ठाणेदार हरीश गवळी व चान्नी पोलीस स्टेशनचे राहुल वाघ यांनी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.