दिग्रस (जि. अकोला), दि. २४- पातूर पंचायत समितीची वार्षिक आमसभा २४ मार्च रोजी स्थानिक सोपीनाथ महाराज संस्थानात आयोजित करण्यात आली होती. या आमसभेत एका नागरिकाने स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई का करीत नाही, या कारणावरून संतप्त होत मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी त्याला वेळीच अडविल्याने अघटित घटना टळली. या घटनेनंतर आमदार सिरस्कार यांनी ही आमसभा तहकूब केली.पातूर पंचायत समितीमधील सरपंच, उपसरपंचांचे शिबिर व पंचायत समितीच्या या वार्षिक आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार बळीराम सिरस्कार होते. यावेळी दिग्रस येथील मंगेश इंगळे या नागरिकाने स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रार केली. त्याने या दुकानाबाबत दिलेल्या तक्रारीवर शंभरांच्यावर ग्रामस्थांची स्वाक्षरी असूनही या दुकानावर कारवाई का होत नाही, यामागे ग्रामस्थांना सहकार्य नसून, स्वस्त धान्य दुकानदाराला सहकार्य करीत आहात, असा आरोप आमदार सिरस्कार यांच्यावर केला. त्यामुळे या विषयावरील चर्चा बराच वेळपर्यंंंत चालू राहिली. त्यावेळी संतप्त झालेल्या मंगेश इंगळेने त्याच्या पायातील चप्पल काढून मंचावर फेकून मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्या बाजूच्या जागरूक नागरिकांनी त्याला वेळीच अडविल्याने हा प्रसंग टळला.या घटनेमुळे सभेत गोंधळ होऊन जमलेले सरपंच, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ सभास्थळाहून उठून बाहेर गेले. त्यामुळे आमसभेचे अध्यक्ष आमदार सिरस्कार यांनी सदर आमसभा तहकूब केली. आता ही आमसभा १0 एप्रिल रोजी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दरम्यान संबधीत व्यक्तीने केलेल्या आरोपसंदर्भात आपला काहीही संबध नसल्याचे आ.सिरस्कार यांनी सांगीतले.
आमसभेत मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 25, 2017 2:00 AM