अकोला: महापालिकेची सप्टेंबर २०१६ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना मनपा प्रशासनाने सेवेत घेतले. परंतु प्रशासनाने आस्थापनेत समायाेजन न केल्याचा आरोप करत शुक्रवारी मनपा कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह महापालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
राज्य शासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेची हद्दवाढ केली. यामध्ये शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्यात आला हाेता. हद्दवाढ केल्यानंतर ग्रामपंचायतींमधील सेवारत कर्मचाऱ्यांचे मनपाच्या आस्थापनेवर समायाेजन करणे अपेक्षित हाेते. प्रशासनाने तसे न करता संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर सेवेत रूजू करुन घेतले. प्रशासनाच्या भूमिकेविराेधात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन द्वारा संचालित अकोला मनपा वाढीव हद्दीतील ग्रामपंचायत कर्मचारी कृति समितीने याबाबत सतत पाठपुरावा केला. कर्मचाऱ्यांच्या समायाेजनाच्या मुद्यावर मनपा प्रशासन गंभीर नसल्यामुळेच आमच्यासमाेर आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष विठोबा दाळू, सचिव प्रशांत देशमुख, संघटक गजानन तायडे, योगेश रोडे, जय मोरे यांनी नमूद करीत शुक्रवारी मनपा आवारात कुटुंबियांसहीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्यांना उपस्थित पोलीस व मनपाच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी खबरदारी म्हणून आंदोलकांना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यावरही समायाेजन नाहीच!मनपाद्वारे गठीत विभागीय पात्रता समितीने तत्कालीन ८९ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी ३१ कर्मचाऱ्यांना पात्र ठरवले होते. त्यावर नगरविकास विभागाच्या मार्गदर्शन पत्रानुसार पुन्हा पडताळणी केली असता ३१ पैकी ५ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने २६ कर्मचारी पात्र दर्शविण्यात आले आहेत. या पात्र कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विद्यमान न्यायालयाने योग्य निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचा आदेश महापालिकेला दिला हाेता. त्यानंतरही प्रशासनाने समायाेजन केले नसल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला.
मनपा उपायुक्तांची महिलांसोबत चर्चामनपा प्रशासनाच्या वतीने उपायुक्त गीता वंजारी यांनी मुख्यालयाच्या आवारात आत्मदहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. तसे न करता उपायुक्त वंजारी यांनी कर्मचाऱ्यांच्या पत्नीसोबत चर्चा केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे समायोजन आस्थापनेवर करण्याबाबत महापालिका अजिबात गंभीर नसल्याचे दिसून आले.