अकोला : स्थानिक एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचे प्राण वाचविले. यामध्ये पत्रकारास किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
स्थानिक एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राजेश अमृतकर हे बुधवारी दुपारी अचानक रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले. त्यानंतर गळ्यात दोर बांधून पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडा ओरड झाल्याने बाजूलाच असलेल्या रामदासपेठ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर राजेश अमृतकर यांनी पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले. यादरम्यान अमृतकर यांना किरकोळ दुखापत झाली. पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर अमृतकर यांनी गळफास लावण्यासाठी एक दोरी बांधून घेतली होती; मात्र पाण्याच्या टाकीवरून उडी घेण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात अमृतकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. राजेश अमृतकर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र कौटुंबिक कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा घटनास्थळावर होती.