मूर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील कोविड विलगीकरण कक्षात उपचारार्थ असलेल्या ६५ वर्षीय इसमाने रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरून मागच्या बाजूला खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४: ३० वाजताच्या दरम्यान घडली. काही दिवसांपूर्वी तपासणी दरम्यान सदर इसमाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यामुळे त्या इसमाला हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. त्या नंतर तेथून लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयातील कोविड अलगीकरण कक्षात ३० एप्रिल रोजी (शुक्रवार) दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु कंटाळून त्याने दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयातील वरच्या मजल्यावरुन पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या खुल्या खिडकितून स्वतःला खाली झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लगेच सारवासारव करण्यात आली असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगीतले, आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात इसम जखमी झाला असून त्याच्या हाताला व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे.
हेंडज येथील कोविड सेंटर मधून शुक्रवारीच त्या इसमाला येथील विलगिकरण कक्षात दाखल केले होते. त्याने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो पायऱ्यावरुन घसरुन जखमी झाला, उपचार करुन पुन्हा विलगीकरणात ठेवण्यात आले.
- राजेंद्र नेमाडेसहायक वैद्यकीय अधिकारी, लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापुर