आकोट (अकोला) : आकोट मतदार संघातील सिंचन , पिण्याचे पाणी, रस्ते, विज व आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्याकरीता शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. विज रोहीत्राचा प्रश्न निकाली निघत आहे.हिवाळी अधिवेशनात निधीचा प्रश्न निकाली निघाला नाही, मात्र निधी येताच रस्त्यांच्या कामास प्राधान्य देवू, असे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पणज व शहापुर धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. पोपटखेड धरण परिसरात ५५ घरांचे पुर्नवसन व ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीकरीता ५0 लाखासाठी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र दिले आहे. ८४ खेडी योजनेत तेल्हार तालुक्यातील ८ व आकोट तालुक्यातील २२ गावं येतात. त्यामुळे १५९ गावांकरीता स्वंत्रत योजना तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती भारसाकळे यांनी दिली. शहराकरिता पाणी पुरवठा उपाय योजना करण्यास मुख्याधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. विज रोहित्र मोठय़ा प्रमाणात बसविण्यात आली; परंतु ग्राहकसंख्या पाहता आकोटात २२0 के.व्हीचे पॉवर स्टेशन, तेल्हारा येथे १२0के.व्हीचे पॉवर स्टेशन तसेच आकोट येथे विभागीय कार्यालयाकरिता प्रस्ताव तयार करण्याकरिता सर्व्हे करण्यात येत आहे. आकोट ग्रामीण रुग्णालयात १00 खाटांचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांना दिला असून, पाठपुरावा सुरु आहे, असेही भारसाकळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष संदीप उगले, शहरअध्यक्ष योगेश नाठे, संतोष झुनझुनवाला, कनक कोटक, नगरसेवक मंगेश चिखले, कुसुम भगत अनिरुध्द देशपांडे, मंगेश पटके उपस्थित होते.
पाणी, रस्ते, वीज व आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न
By admin | Published: December 29, 2014 1:45 AM