अकोला: रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृतरीत्या अनेक तिकीट दलाल सक्रिय आहेत. आरपीएफ द्वारा सुरू करण्यात आलेल्या विशेष अभियानादरम्यान गुरुवारी एका अनधिकृत रेल्वे तिकीट दलालाला पोलिसांनी पकडून त्याच्याविरुद्ध रेल्वे अधिनियम कलम १४३ नुसार गुन्हा दाखल केला. आरपीएफचे साहाय्यक पोलीस उप-निरीक्षक मनसिंह मरकाम रेल्वे स्टेशन परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांची नजर एका व्यक्तीवर गेली. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळ १२ आरक्षित रेल्वे तिकीट आणि एक रद्द आरक्षित तिकीट मिळून आले. या व्यक्तीने त्याचे नाव शंकर बटुक महाराज केवट (३९) असल्याचे पोलिसांना सांगितले. तो जठारपेठ परिसरातील राहणारा आहे. रेल्वे तिकिटांसोबतच त्याच्याकडे रोख ४३0 रुपये मिळून आले. पोलिसांनी रेल्वे तिकिटे व रोख जप्त केली. रेल्वे तिकीट दलालावर आरसीएफ पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दलालांमध्ये खळबळ उडाली आहे. रेल्वे तिकीट दलालांमुळे अनेकांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे या दलालांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
रेल्वे तिकीट दलाल अटकेत
By admin | Published: September 25, 2015 1:06 AM