अकोला : कोरोनाबाधित रुग्णांकरिता करण्यात येत असलेल्या ऑक्सिजनपुरवठ्याचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’द्वारे दिले.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी ऑनलाइन पद्धतीने घेतला. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येत असलेल्या ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने वापर होतो की नाही, यासंदर्भात ऑडिट करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार सुविधांचा आढावा घेत, रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता, कोरोना चाचण्या यासंदर्भात आढावा घेत, कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजकुमार चव्हाण आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.