अकोला: शहरातील वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, ग्रामीण परवाना असलेला आॅटोंचा शहरातील धुडगूस तसेच अशोक वाटिका चौकात सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरात आॅटोचालकांना शिस्तच नसल्याने वाहतुकीला आॅटोचालकांनीच अडथळा निर्माण केल्याचे दिसून येत आहे.अशोक वाटिका चौकापासून ते न्यायालयापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाल्याने खदान पोलीस ठाण्याकडे जाणारी वाहतूक नेहरू पार्क चौकातून वळविण्यात आली आहे. नेमकी नेहरू पार्क चौकातच कापड दुकाने रस्त्यावर थाटल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे अशोक वाटिका चौकाकडून नेहरू पार्ककडे येणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण होत आहे. तर खदान पोलीस ठाण्यासमोरून नेहरू पार्क चौकाकडे जाणाºया वाहतुकीला तीनही मार्गावरील अडथळे येत असल्याने या ठिकाणी रोजच किरकोळ अपघात होत असल्याचे वास्तव आहे. गोरक्षण रोडवर कापडांची दुकाने, रसवंती, अंडा आमलेट, पाणीपुरी व इतर खाद्यपदार्थांची वाहने रस्त्यावर लागत असल्याने या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळते; मात्र यासह शहरातील मुख्य बाजारपेठेतही वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नेहरू पार्क चौकात लागलेली रसवंती, कापडांच्या दुकानांमुळे या ठिकाणी दिवसातून १२ ते १५ वेळा जाम लागत असून, या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याचे कामकाज वाहतूक शाखेच्या पोलिसांंच्याही आवाक्याबाहेर काम होत असल्याचे वास्तव आहे.