चिखली (जि. बुलडाणा): येथील ग्रामीण रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकार्यांनी गर्भवती महिलेला हेतुपुरस्सर चुकीचा सल्ला देऊन बाहेरचा रस्ता दाखविल्याने तिची प्रसूती ऑटोरिक्षात झाल्याने रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.चिखली येथील रेश्माबी शेख मोहसीन या गर्भवतीची ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.टी. खान यांनी तपासणी करून सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यानुसार रिपोर्टवरून डॉ. खान यांनी प्रसूतीला आणखी दोन दिवस वेळ असल्याचे सांगून रेश्माबी यांना घरी नेण्याचा सल्ला दिला; परंतु घरी जाताच रेश्माबी यांना तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला पुन्हा सायंकाळच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. खान यांनी पोटात पाणी कमी असल्याचे तसेच बाळाचे वजनही कमी असल्याचे कारण पुढे करून ह्यसिझरह्ण करण्याचा सल्ला दिला. यावेळी दोहोंच्या जिवाला धोका असल्याचे सांगून त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले व तसे पत्रही गर्भवतीच्या कुटुंबीयांकडून लिहून घेतले. दरम्यान, आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने सदर गर्भवती महिला रेश्माबींच्या कुटुंबीयांनी येथेच प्रसूती करा, अशी विनवणी डॉ. खान यांना केली; मात्र डॉ. खान यांनी या विनवणीला साफ धुडाकावून लावले. परिणामी डॉ. खान व रेश्माबीच्या नातलगांमध्ये शाब्दिक वाददेखील उद्भवला. शेवटी कुटुंबीयांनी रेश्माबी यांना हलविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ऑटोने जात असताना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर तिची ऑटोरिक्षातच प्रसूती होऊन तिने एका गोंडस बाळाला नैसर्गिकरीत्या जन्म दिला. सद्य:स्थितीत नवजात शिशू व माता दोघांची प्रकृतीदेखील उत्तम असली तरी या घटनेने येथील ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला आहे. प्रसूतीनंतर रेश्माबीच्या नातलगांनी जाब विचारण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गाठले असता तिथे त्यांचे पती डॉ. आरीफ खान यांनीदेखील उद्यामपणा दर्शवित अरेरावीची भाषा वापरल्याने वाद वाढला होता व पोलिसांना पाचारण करावे लागले होते. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शमला असला तरी खान या डॉक्टर दाम्पत्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी रेश्माबीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
ऑटोरिक्षात ‘प्रसूती’!
By admin | Published: October 13, 2015 11:30 PM