अकोला : महावितरणच्या १६ परिमंडलातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे दहा हजार धनादेश दरमहा विविध कारणांमुळे अनादर (बाऊंस) होतात. त्यासाठी संबधित वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता १ नोव्हेंबरपासून धनादेशाचा अनादर झाल्यास १५०० रुपये किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे.महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे व १ नोव्हेंबर २०१८ पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे. मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश अनादर (बाऊंस) झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.३२ लाख ग्राहक करतात आॅनलाईन भरणाराज्यातील सुमारे ३२ लाख ग्राहक दरमहा अंदाजे ५४६ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा आॅनलाईनद्वारे करतात. महावितरणच्या ग्राहकांकरिता घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अॅॅप किंवा ईसीएसची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.