अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या साथीमध्ये यंदा एप्रिल ते जुलै या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल १,६७१ मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. कोरोनामुळे यावर्षी मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची भीती नागरिकांमध्ये आहे; मात्र गेल्या पाच वर्षात अकोला शहरात नोंदविण्यात आलेल्या मृत्यूची सरासरी पाहता कोरोना काळातही मृत्यूचे प्रमाण हे सरासरी एवढेच असल्याचे समोर आले आहे.शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती आहे. ७ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाचा कहर वाढताचा राहिला आहे. गेल्या १५ दिवसांपासून अकोला शहरातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावला असला तरी ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामध्ये मृत्यूची संख्याही १४४ पर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे साहजिकच कोरोनामुळे यावर्षी मृत्यूची संख्या वाढल्याची भीती नागरिकांमध्ये आहे.या संदर्भात गेल्या पाच वर्षात अकोला शहरात नोंदविण्यात आलेल्या मृत्यूची आकडेवारी तपासली असता मृत्यूचे सरासरी प्रमाण हे सारखेच असल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१९ या चार वर्षातील जानेवारी ते जुलै या सात महिन्यात सरासरी ३,२७४ मृत्यू झाले आहेत; मात्र याच कालावधीत २०२० या चालू वर्षात सरासरी २,९९६ मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या काळात अशी आहे मृत्यूची नोंदएप्रिलपासून कोरोनाचा काळ गृहीत धरून गेल्या पाच वर्षातील मृत्यूची सरासरी काढली असता यावर्षी ९ मृत्यू अधिक नोंदविले आहेत; मात्र सरासरीसोबत तुलना केली असता फार मोठी तफावत दिसत नाही. २०१५ ते २०१९ मधील एप्रिल ते जुलै या कालावधीत मृत्यूचे सरासरी प्रमाण हे १,४१० एवढे आहे तर याच कालावधीत २०२० मध्ये नोंदविलेले मृत्यू हे १,४१९ आहेत.
कोरोना आधीच्या काळातही मृत्यूचे प्रमाण कमीजानेवारी ते मार्च हे महिने कोरानाचा उद्रेक सुरू होण्यापूर्वीचा काळ आहे. २०१५ ते २०१९ या चार वर्षात जानेवारी ते मार्चमध्ये सरासरी १,४३३ मृत्यूची नोंद झाली आहे. तर या वर्षात याच काळात १,३२५ मृत्यूची नोंद झाली आहे.