अकोला : बाजार समितीत मुगाची आवक सुरू आहे. बुधवारी मुगाला ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. तर कमीतकमी ६ हजार ४००, जास्तीतजास्त ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर होता. बाजार समितीत २८ क्विंटल आवक झाली.
----------------------------------------
अकोल्याचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअस
अकोला : जिल्ह्याच्या तापमानात काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमान होय. मंगळवारी जिल्ह्यात ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
---------------------------------------
फुल विक्रेत्यांवर संक्रांत
अकोला : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने फुल विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. जिल्ह्यात ११२ फुल विक्रेत्यांचा याच व्यवसायावर उदरनिर्वाह होतो. फुल अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
---------------------------------------
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
अकोला : शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहेत; मात्र याबाबत अद्याप तारखा व वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम कायम आहे.
--------------------------------------------
फळांची मागणी वाढली!
अकोला : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, डाळींब, पेरू, अननस, पपई, कलिंगड तसेच आंब्याची मागणी होत आहे. रविवारी फळांसाठी आणखी मागणी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
--------------------------------------------
पाणंद रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रास
अकोला : ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनही दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना-जाताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतमाल घेऊन जातानाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
----------------------------------------------
मशरुम शेतीकडे वाढला कल
अकोला : जिल्ह्यात मशरुम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शहरातील किराणा, भाजीपाला दुकानावर मशरुमची विक्री वाढली आहे. ग्राहकांकडून मागणी चांगली असून दरही मिळत असल्याने शेतकरी मशरुम शेतीकडे वळत आहे.
----------------------------------------------------
कांद्याचे दर स्थिर
अकोला : जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक जण कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने साठवणूक करीत आहेत. बुधवारी कांद्याला ८००-१२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. बाजारात कांद्याची आवक कमी आहे.