अवनी हिची अचंबित करणारी शैक्षणिक कामगिरी युवा वर्गाला निश्चितच प्रेरणादायी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिउच्च दर्जा धारण केलेले एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-तीन विद्यापीठे शतप्रतिशत स्कॉलरशिपसह प्रवेश देण्यासाठी सन्मानाने निमंत्रित करीत आहेत आणि त्या विद्यार्थ्याला त्याच्या मर्जीने पाहिजे त्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याच्या संधीची कदाचित ही अद्वितीय घटना असावी. जगातील सर्वोत्तम मानांकित अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) १०० टक्के स्कॉलरशिपसह, कॅलिफोर्निया राज्यातीलच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (स्टॅनफोर्ड फेलोशिपसह) आणि मँसँच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी, जेकब्स प्रेसिडेन्सियल फेलोशिपसह), बोस्टन, अमेरिका या तिन्ही विद्यापीठांमध्ये अवनी हिची प्रवेशासाठी निवड झाली आहे.
सुरुवातीपासूनच असाधारण बुद्धिमता असणारी अवनी हिचे बुद्धिकौशल्य २०१४ सालीच इयता दहावीतील तिच्या यशाने (९९.२० टक्के) सर्वांनाच दिसले होते. तेव्हा ती राज्यातून प्रथम आली होती. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विषयात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीआयटीएस, पिलानी) गोवा कॅम्पसमध्ये सर्व विद्यार्थ्यांत प्रथम असणाऱ्या अवनीने दैनंदिन अभ्यासासह शोधपत्रिका वाचक समूह स्थापन करण्यासोबतच विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधित्व सुद्धा केले आहे. सन २०१९ मध्ये पोलंड येथे आयोजित युरोपियन सॉलिड स्टेट सर्किट परिषदेत युनिव्हर्सिटी ऑफ ट्वेंटे, नेदरलंड यांच्याकडून दिला जाणारा आयसीडी ग्रुपचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करणारी अवनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध स्कॉलरशिप प्राप्त करणारी देशातील ०.१ टक्के विद्यार्थ्यात असणे ही गौरवाची बाब असून, तिने टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्स बेंगलोर येथे एक वर्ष सेवा सुद्धा दिली आहे. ती सुद्धा सध्या अभियांत्रिकी विषयात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीआयटीएस, पिलानी) गोवा कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. त्याचप्रमाणे अवनी हिची आई वैदेही रामदास खोडकुंभे या अकोला येथीलच आरएलटी विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत.