अकाेट : डिसेंबर व जानेवारी महिन्यांत रात्रीच्या तापमानात घट व रात्रीच्या कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगांना उपजीविकेसाठी अनुकूल वातावरण ठरत आहे. त्याकरिता सद्य:परिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून, हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्याचे आवाहन अकोट कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात सामूहिकरीत्या नरपतंग गोळा करून नष्ट करावे. जिनिंग-प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावे. जानेवारी महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या नख्यांमध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असून पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतातील अवशेष नष्ट करणे अवश्यक आहे. डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तावस्थेत जाते. परंतु, फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. पीककाढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
फरदड कापूस पिकांवर येणाऱ्या अळ्यांना हंगामानंतर सतत खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे किडींचा पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कापूस पिकाचा कालावधी जसाजसा वाढत जातो, त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे बोंडअळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते. खरीप हंगामात पिठ्या ढेकूण व पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनात घट होते व पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्याचे आवाहन अकोट तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.