अकाेला : काेराेनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर जमावबंदी आदेश लागू केले जात आहेत. याचा परिणाम आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा व वसतिगृहांवर झाला असून, शाळा व वसतिगृहांना पुन्हा टाळे लावण्याची वेळ या विभागावर ओढवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड हाेत असल्याचे समाेर आले आहे.
मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा काेराेनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ हाेऊ लागली आहे. काेराेनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशातून शासनाने कठाेर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्या अनुषंगाने अकाेला व बुलडाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. याचा परिणाम आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांवर हाेऊन शाळा व वसतिगृहांना टाळे लावण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे अतिदुर्गम व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांची परवड हाेणार आहे.
तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसाेय
अकाेला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाची एकूण १६ वसतिगृह आहेत. अनुदानित आश्रमशाळा १९ असून, आठ शासकीय आश्रमशाळा आहेत. मध्यंतरी नववी व बारावीचे वर्ग सुरु केल्याने वसतिगृहे सुरु करण्यात आली हाेती. मात्र, जमावबंदी आदेशामुळे पुन्हा एकदा आश्रमशाळा व वसतिगृह बंद केली जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेणार आहे.